वाई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र भिंती उभ्या राहताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी हातमिळवणी केली, परंतु, वाई नगरपरिषदेच्या रणांगणात हीच महायुती विखुरलेली आणि गोंधळलेली दिसते आहे. यामुळे ‘राज्य व केंद्रात महायुती एकत्र आहे, मग वाईत का नाही?’ असा एकच प्रश्न वाईकरांच्या मनात आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत महायुती कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांना विजय मिळवून दिला. तसेच विधानसभेत मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील यांना वाई- खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील जनतेने मोठा विश्वास दाखवला. त्यावेळी ‘वाईचा विकास, महायुतीचा विश्वास’ असा नारा बुलंद केला गेला. वाईत ‘उन्हाळी थंडी’चे राजकारण तापले आहे. सध्याच्या हालचालींवरून वाई नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्री मकरंद पाटील यांचा हा हक्काचा मतदारसंघ असला तरी थंडीच्या दिवसांतही राजकीय तापमान चढलेले आहे. वाईचे राजकारण आता ‘महायुती’ आणि ‘विकास’ या दोन शब्दांमध्ये गुंतले आहे. परंतु, ‘गट, जात, पक्ष’ यापलीकडे जाऊन वाईचा विकास कोण करणार? हा खरा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. वाईचे भविष्य ठरवणारा निर्णय या निवडणुकीतच होणार आहे, हे निश्चित!