पिंपरी | श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा लोणावळ्यात महायुतीकडून जल्लोष

लोणावळा, (वार्ताहर) – महायुतीमधील शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा जागेवर हॅटट्रिक करीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला. श्रीरंग बारणे यांच्या या विजयाचा जल्लोष लोणावळा शहरात महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत आणि विजयाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा केला.
लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ६ वाजता महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते जमले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या तसेच महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला, तरी जनतेने स्पष्ट बहुमत दिले असल्याने एनडीए आघाडी हीच सत्तेत बसणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
मावळ लोकसभेची निवडणूक महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे पाटील यांच्याकडून अत्यंत चुरशीने लढवली गेली होती. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटी याठिकाणी कोणाचाही एकतर्फी विजय होणार नाही, असे सांगितले जाते होते.
शिवाय येथे नक्की कोणाचा विजय होईल हे देखील कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. मात्र, सर्व शक्यता फोल ठरवीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार मताधिक्य मिळवत याठिकाणी वाघिरे यांना चितपट केले.





