सासवड : सासवड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांनी विस्तृत आणि सर्वसमावेशक वचननामा जाहीर केला असून शहराच्या समतोल, पर्यावरणपूरक आणि वेगवान विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “मशाल” या निवडणूक चिन्हावर मतदान करून नागरिकांनी आपल्या सेवेसाठी संधी द्यावी, असे ते म्हणाले. वचननाम्यात शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरिकीकरण, दररोज पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, शहर स्वच्छता व सौंदर्याकरण या प्रमुख मुद्द्यांना अग्रक्रम दिला आहे. शिवाय नागरी वसाहतींतील अवैध व्यवसायांवर निर्बंध, खुल्या जागांची आरक्षणे, बंद बगीच्यांचे पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी नागरी सुविधा बळकट करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील बाजारपेठ व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक, स्वच्छतागृहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजारतळातील अडचणी दूर करण्याचा मानसही व्यक्त केला. अतिक्रमित दफनभूमी, नवीन जलकुंभ, भूमिगत केबलिंग, मुख्य रस्त्यांचे कॉक्रीटीकरण अशा पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आणि बालकल्याणाच्या दृष्टीने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर व माता रमाबाई आंबेडकर यांना समर्पित “मातृपीठ” उभारण्याची, महिला बचतगट व एकल महिलांना स्वयंपूर्ण करण्याच्या योजना राबवण्याची घोषणाही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक ओळखीत भर घालण्यासाठी भव्य मुख्य प्रवेशद्वार, नागरिकांमधून मार्गदर्शक समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडला. नगरपरिषद आपल्या दारी उपक्रम राबवणार युवा आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगारसंधींसाठी माहिती संकलन, दिव्यांगांसाठी २४x७ हेल्पलाईन, जेष्ठांसाठी नाना–नानी पार्क प्रत्येक प्रभागात वाचनालय उभारण्याचे आश्वासन वचननाम्यात आहे. “नगरपरिषद आपल्या दारी” हा उपक्रम दर तीन महिन्यांनी राबवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. नगरपालिकेतील ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय नियमांनुसार सुरळीत व्हावे यासाठी पावले उचलली जाणार असून शिलकी अर्थसंकल्पातून करदात्यांना सवलती देण्याचाही विचार आहे. सासवडचा सर्वांगीण विकास आणि राजकारणविरहित प्रामाणिक उत्तर देणारी व्यवस्थाच आमचे ध्येय आहे.