Mahavikas Aaghadi | Pruthaviraj Chavan : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही आणि याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं देखील सांगितलं आहे. दरम्यान, अश्यातच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? त्याची निवड कशी होईल, यावर मोठे भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘जो पक्ष सर्वात मोठा असतो, त्याचा मुख्यमंत्री होतो, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे ते म्हणाले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना याच फॉर्म्युला आधारे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता. येथे विरोधक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा निर्णय काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही अगोदरच 32 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकून हा दावा खरा करून दाखवला. आता विधानसभेला पण महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला. संजय राऊत काय म्हणाले? वाचा… काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. चेहरा असेल तर उत्तम. मतांची टक्केवारी यामुळे वाढवता येते. लोकं पक्षाबरोबर चेहऱ्याला ही मतदान करतात. भाजपमध्ये कोणताही चेहरा नाही. जे आहेत ते उधारीचे आहेत. काही लोकांनी मोदींना मतदान केलंय. हा फरक असतो पक्ष आणि चेहऱ्याचा. मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा असते. पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल. घटकपक्षांवर ही चर्चा होईल. ते आमचे सहकारी आहेत. लोकसभेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे’. असं राऊत यावेळी म्हणाले. विधानसभेचा फॉर्म्युला काय? तेव्हा ही कोणताही फॉर्म्युला नव्हता. आताही कोणता फॉर्म्युला नाही. फॉर्म्युला घेऊन आघाडी होत नाही. कोणताही फॉर्म्युला घेऊन आघाडी तयार होत नाही. तिघांनी एकत्र येऊन भ्रष्ट आणि दरोडेखोरांचं सरकार दूर करायचं आहे हाच आमचा फॉर्म्युला आहे. असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.