महावितरणच्या कंत्राटी कामगारांची सुरक्षा “रामभरोसे’

अपुरी सुरक्षा यंत्रणा : ठेकेदारांकडून सुरक्षिततेबाबत होतेय बेपर्वाई

वडगाव मावळ – महावितरणच्या कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची सुरक्षा “रामभरोसे’ आहे. विद्युत खांब आणि विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याची बाब उघड झाली आहे.

मावळ तालुक्‍यात जुनी धोकादायक तसेच नव्याने विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ठेकेदारांच्या वतीने विद्युत खांब उभारणे तसेच वीज तारा ओढण्याचे काम केले जाते आहे. प्रत्यक्ष कामाच्या वेळी कंत्राटी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, अर्थिंग रॉड, हॅन्डग्लोज व बूट दिले जात नाहीत. अनेक कंत्राटी कामगार विद्युत खांब आणि विद्युत तारा ओढ्याच्या कामात सुमारे 30 ते 35 फूट उंचीच्या विद्युत खांबावर उभे राहून काम करीत आहेत. यापूर्वी अनेकदा अचानक तोल जाऊन कंत्राटी कामगार खाली पडले आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर ते कंत्राटी कामगार असून, आमचे कर्मचारी सुरक्षा साधनांचा उपयोग करतात, अशी टोलवा टोलवीची उत्तरे देत आहेत. महावितरण कंत्राटी कामगारांच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसत आहे.

विद्युत खांब व विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करण्याची मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते विशाल वहिले, यशवंत शिंदे, दिनेश पगडे, शरद मोरे, हरीश दानवे आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महावितरण उपअभियंता विजय जाधव म्हणाले की, विद्युत खांब, विद्युत तारा ओढण्याच्या कामात कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, अर्थिंग रॉड, हॅन्डग्लोज व बूट ही सुरक्षा साधने वापरणे आवश्‍यक आहे. अपघात झाल्यास संबधित ठेकेदाराच जबाबदार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.