नेवासा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) कडून विद्युत सहायक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून, या निर्णयामुळे हजारो परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या पारदर्शक आणि निष्पक्ष कामकाजाबद्दल उमेदवारांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत. (Electricity Board) महापारेषण ही राज्यभर उच्च दाबाने वीज वहन करणारी महत्त्वाची कंपनी असून, तिचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. त्यामुळे आयटीआय पदवीधारकांसाठी येथे नोकरी मिळवणे हे मोठे स्वप्न मानले जाते. या पार्श्वभूमीवर, कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 277 पात्र उमेदवारांची विद्युत सहायक प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इतरही अनेक पदांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ – 74 पदे, तंत्रज्ञ-1 – 120 पदे, तंत्रज्ञ-2 – 64 पदे, वित्त व लेखा विभागातील लिपिक 260 पदे यांचा समावेश होता. ही संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचे उमेदवारांनी सांगितले. (Electricity Board) मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालिका सुचिता भिकाने आणि मुख्य महाव्यवस्थापक राजू गायकवाड यांच्या कार्यपद्धतीचे उमेदवारांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद देत उमेदवारांशी सतत संवाद साधला. निवड झालेल्या उमेदवारांपैकी बहुतांश जण मध्यमवर्गीय व गरजू कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेल्या या यशामुळे उमेदवारांनी फोन, व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमांतून प्रशासनाचे आभार मानले आहेत. महापारेषणने पारदर्शक आणि सकारात्मक भरती प्रक्रिया राबवून प्रशासन व उमेदवार यांच्यात विश्वास निर्माण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातही सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Electricity Board)