लंडन : महात्मा गांधींच्या एका दुर्मिळ तैलचित्राचा लंडनमधील बोनहोम्समध्ये तब्बल दिड लाख पौंडांना लिलाव करण्यात आला आहे. या दुर्मिळ तैलचित्रासाठी महात्मा गांधी चित्रकारासमोर बसण्यास तयार झाले होते, असे मानले जाते आहे. हे तैलचित्र आतापर्यंत कधीही विकले गेले नव्हते. ऑनलाइन लिलावासाठी या तैलचित्राचे किमान मूल्य ५० ते ७० हजार पौंड निश्चित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी झालेल्या लिलावामध्ये या तैलचित्राला तब्बल १५२,८०० पौंडांची बोली लागली. १९३१ मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गांधीजी लंडनला गेले होते. तेव्हा चित्रकार क्लेअर लेयटन यांची त्यांच्याशी ओळख झाली. तैलचित्र काढण्याची परवानगी गांधीजींकडून मिळवल्यानंतर हे चित्र साकारण्यात आले. त्यापुर्वी आणि त्यानंतर कधीच गांधीजींनी स्वतःचे चित्र काढण्यासाठी स्थिर बसण्याची परवानगी दिल्याचे ऐकिवात नाही. क्लेअर लेयटन यांचे निधन १९८९ मध्ये झाले. तोपर्यंत हे चित्र त्यांच्या संग्रहात राहिले, त्यानंतर ते लेयटन यांच्या कुटुंबाकडून हस्तांतरित झाले. राजकीय पत्रकार हेन्री नोएल ब्रेल्सफोर्ड हे लेयटन यांचे मित्र होते. त्यांचा भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा होता. १९३० मध्ये ब्रेल्सफोर्ड यांनी या देशाचा दौरा केला होता आणि नंतर भारतीय स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ रिबेल इंडिया हे पुस्तक प्रकाशित केले होते, त्याच वर्षी ते गोलमेज परिषदेत गांधींना पहिल्यांदा भेटले होते. याच सुमारास लेयटन यांची गांधीजींशी ओळख करून दिली गेली. त्या नेहमीच गांधीजींची रेखाचित्रा काढत असत. १९३१ च्या नोव्हेंबरमध्ये, लेयटन यांनी लंडनमधील अल्बानी गॅलरीमध्ये एका प्रदर्शनात गांधीजींचे त्यांनी रेखाटलेले चित्र पहिल्यांदा प्रदर्शित केले होते.