Mahashivratri : महाशिवरात्रीच्या उत्सवाला गालबोट ! 4 भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर : आज सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. एकीकडे हा उत्सव सुरु असताना दुसरीकडे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये उत्साहाला गालबोट लागलं आहे. यामध्ये वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या ३ भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर गडचिरोलीमध्येही एका भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
पहिली घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा या ठिकाणी घडली. तुषार शालिक आत्राम (18) मंगेश बंडू चणकापुरे (20) आणि अनिकेत शंकर कोडापे (18) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तिघेही वर्धा नदीवर आंघोळीला गेले होते. आंघोळीसाठी नदीत उतरल्यानंतर या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
गडचिरोलीत एका भाविकाचा बुडून मृत्यू
दुसरी घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिषेक मेश्राम ( रा. चंद्रपूर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या दोन्ही घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.





