Devendra Fadnavis On Uddhav Thackeray – लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून राज्यात राजकीय आरोप–प्रत्यारोपांना वेग आला आहे. यात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद पेटला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असे उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यातच दक्षिण मध्य मुंबईतील सभेत फडणवीस यांना ‘कोडगा माणूस’ असे म्हटले.
या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट टाकून, हे महाराष्ट्राचे समाजकारण आहे, ही काही सलीम – जावेदची स्क्रिप्ट नाही, अशा स्क्रिप्ट करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही. हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे.
संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?
महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, अशा शब्दांत समाचार घेतला.