मुंबई – महाराष्ट्रातील वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन करणार्या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी होऊ लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रान्समिशन कंपनीची नोंदणी शेअर बाजारात पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये होण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. इतर कंपन्यांचीही नोंदणी लगेच शेअर बाजारावर करण्याचा प्रयत्न आहे. या कंपन्यांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढावी यासाठी ही नोंदणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील कंपन्या आणि महामंडळांची शेअर बाजारावर नोंदणी करण्याची गरज आधुनिक काळात निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार काही वर्षापासून प्रयत्न करत आहे. वीज ट्रान्समिशन कंपनीची शेअर बाजारावर पुढील वर्षात नोंदणी झाल्यानंतर लगेच वीज निर्मिती कंपनीची शेअर बाजारावर नोंदणी करण्याची शक्यता पडताळण्यात येईल. त्यानंतर वीज वितरण कंपनीचीही शेअर बाजारावर नोंदणी करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.