पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ संकल्पात महाराष्ट्राचे योगदान वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – भारताची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्राचे योगदान वाढणार आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई महाराष्ट्राच्या आगामी काळातील वाढलेल्या विकासात मोठे योगदान देणार आहे. पुढील काही वर्षात मुंबई वित्तीय तंत्रज्ञानाची म्हणजे फिनटेकची राजधानी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने ठरविल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार झाला. आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने 0.5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा ओलांडला आहे. एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे.
जागतिक हिंदू आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा वेगात विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने तज्ञ व्यक्तींची सल्लागार समिती नेमली आहे. ही समिती महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत आहे.
कोणत्या क्षेत्रात विकास वाढण्यास वाव आहे याची माहिती घेत आहे. या माहितीच्या आधारावर ही तज्ञ समिती महाराष्ट्र सरकारला शक्य तितक्या लवकर आपल्या शिफारसी करेल. या शिफारशीची अंमलबजावणी करून महाराष्ट्र राज्याचा विकास वेगात करण्याचा सरकारचा संकल्प आहे.
पुरवठा साखळीचा भाग होणार –
जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग प्रयत्न करत आहेत. यासाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तयार झालेली उत्पादने देशात शक्य तितक्या लवकर कमी खर्चात जाऊ शकतील. मुंबई – नागपूर हा 700 किलोमीटर चा महामार्ग राज्यातील 16 जिल्ह्यातून जातो आणि तो थेट जवाहरलाल नेहरू बंदराचे जोडला गेलेला आहे. रस्त्याच्या सुधारणा बरोबरच महाराष्ट्रातील विमान सेवा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.





