अग्रलेख : भोवळ येणार…

महाराष्ट्राची यंदाची विधानसभा निवडणूक भोवळ आणणार आहे. मतदानाला जेमतेम 12 दिवस राहिले आहेत, मात्र केवळ मतदारच नाहीत तर निवडणूक लढणारे आणि लढवणारे सगळेच गोंधळात आहेत. पूर्वी मतपत्रिकेवर चार फारतर पाच उमेदवारांची नावे असायची. नंतर ईव्हीएम आले. तेथेही एका मतदारसंघात जास्तीत जास्त 8 ते 10 उमेदवार असायचे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपाशी मतदार थांबायचे आणि एकाला मत देऊन मोकळे व्हायचे. आता सरासरी 14 उमेदवार प्रत्येक मतदारसंघात असल्याचे सांगितले गेले आहे.
त्यात चिन्हांचा गेल्या वर्षभरापासून सुरू झालेला घोळ आहेच, त्यातही एकाच पक्षात आणि एकाच घरात वर्षानुवर्षे एकत्र राहिलेले आता परस्परांच्या विरोधात उभे आहेत. ते जसे परस्परांना परके नाहीत तसेच मतदारांनाही परके नाहीत. मात्र, आपण नेमके कोणाला मत देतो आहोत आणि का देत आहोत किंवा देणार आहोत यामुळे महाराष्ट्रातील मतदार चक्रावला आहे. त्याहीपुढे निवडणुकीनंतर आणखी मोठे बदल घडतील अशीही वाच्यता आहे. म्हणजे नेमके काय होणार आहे? आता एकत्र लढणार्या मित्रांची अदलाबदली घडणार आहे? की सिक्कीमप्रमाणे विरोधी पक्षच राहणार नाही? हा सगळा प्रकारच भोवळ आणणारा आहे. त्यात राज्य कोणत्या दिशेने जाणार याचा अदमास लागेनासा झाला आहे.
महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे हे खरे आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, महसूल, करदाते अशा सगळ्यांच बाबींत वर आहे. केवळ विरोधक ते मानत नाहीत. अर्थात, ते सत्तेवर आल्यावर त्यांचाही हाच दावा आणि आकडेवारी असते जी आताचे सत्ताधारी देत असतात; पण विरोधात असताना या गोष्टी मान्य केल्या तर विरोध कशाचा करणार या न्यायाने ते टीका करत असतात. महाराष्ट्राच्या या विशेष स्थानामुळे दिल्लीचा अथवा त्या त्या वेळेच्या दिल्लीश्वरांचा महाराष्ट्रावर डोळा राहिला आहे. प्रगत राज्य आपल्याकडे असावे असे सगळ्यांना वाटते. तथापि, आताच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारण खरेच आपल्या प्रगत राज्य या लौकिकाचा वारसा सांगते आहे असे दिसत नाही. पक्षांच्या विचारधारांशी बांधिलकी राखत येथे निवडणुका लढल्या गेल्या आणि मतदारांनीही कौल दिला.
साधारण अर्धे शतक येथे प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांचे सरकार राहिले आणि त्यामुळेच राज्य पुढे गेले. चालू दशकात किंबहुना गेल्या पाच-सात वर्षांत मती कुंठित करणार्या घटना घडल्या. पुरोगामी विचारधारेचा अभिमान मिळवणारी मंडळी अचानक ज्यांना जातीवादी किंवा प्रतिगामी म्हणून हिणवत होती त्यांच्या मांडवात जाऊन बसली. तद्वतच धर्माच्या नावाने आणाभाका घेणारे आणि आपली कट्टरता अलंकारासारखी सांभाळणारे अचानक सर्वसमावेशकतेची प्रौढी सांगणार्यांच्या गोटात जाऊन बसले. विशेष म्हणजे ही जी अदलाबदली झाली ती दोन्ही बाजूंनी मनापासून स्वीकारली आणि अगदी सहजपणे नवे मित्र एकरूप झाले. मग प्रश्न असा येतो की इतकी वर्षे परस्परांना पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणून तुटून पडणार्यांत जर एवढेच सख्य होते तर अगोदरच सगळ्यांनी एकत्र यायला हवे होते.
आता जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सगळ्यांच्या हाताशी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेला हा विषय अजूनही थंड झालेला नाही. आता जनगणना केली जाण्याचे सूतोवाच करण्यात आले असले, तरी जातगणना होणार का याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, महाराष्ट्राच्या निवडणुकीत जात फॅक्टर अचानक स्ट्राँग झाला आहे. त्याअनुरूप उमेदवारांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्रबळ इच्छुक असूनही केवळ जातीत बसत नसल्यामुळे त्याला डावलून आपल्याकडचा प्रबळ आणि हवा त्या जातीचा उमेदवार मित्रपक्षाला निर्यात करून त्याची उमेदवारी जाहीर केली गेली आहे. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन प्रमुख आघाड्यांचे अधिकृत उमेदवार, त्या आघाड्यांमधील मित्रपक्षांचे असंतुष्ट उमेदवार, ज्यांना लढायचेच आहे असे अपक्ष आणि आपणच निवडून येणार कारण जात हा फॅक्टर आपला मजबूत आहे असे मानणारे अन्य प्रबळ अशी उमेदवारांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते आहे.
उमेदवारीच्या माघारीच्या दिवशी सगळ्या बंडखोरांचे बंड थंड होईल असा आव आणला गेला तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्याचे कारण आमदार होण्याची क्षमता असलेले किंवा पूर्वी आमदारकी भूषवली आहे मात्र नव्या मित्रांमुळे बिचार्यांना आपल्याच मतदारसंघात सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे असे उमेदवार रिंगणात कायम आहेत. सत्ताधारी आघाडीचे 18 तर विरोधी आघाडीतील 22 उमेदवारांना शांत करण्यात अपयश आले आहे. मात्र हे खरेच अपयश आहे की त्यांना लढण्याची मूकसंमती दिली गेली आहे हेही गौडबंगाल आहे. कारण बंडखोरांना उभे राहण्यात दिली गेलेली रसद ही दुसर्या आणि अखेरच्या अंकाची पूर्वतयारी आहे.
निकालाच्या दिवशी कोणत्या एका आघाडीला स्पष्ट जनादेश मिळाला तर आणि त्यांची एकत्र राहण्याची तयारी असेल तर ठीक, अन्यथा आपण बाजू बदलून पलीकडे गेलो आणि त्यांचे गणित जुळत असेल तर तिकडे जाण्याचा पर्यायही खुला ठेवला गेला आहे. त्या दृष्टिकोनातूनही ही प्रबळ बंडखोर मंडळी सत्ता सिंहासनापर्यंत पोहोचवण्यात उपयुक्तच ठरणार आहे. किंबहुना त्यांनी त्याचवेळी पडद्यामागून समोर यावे अशी रचना केली गेली आहे. आज दोन आघाड्या परस्परांशी लढत आहेत आणि त्यातील एका आघाडीचे सरकार येईल असे दिसते तसे नाही.





