पुणे – विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातून 179 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातून तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार इंदापूरमध्ये 24 जण असून सर्वांत कमी उमेदवार भोर आणि मावळ मतदारसंघात प्रत्येकी सहा उमेदवार निवडणूक लढवित आहे. दरम्यान, मतदान दि. 20 नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी दि.23 नोव्हेंबरला होणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट निवडणूक होत असल्याने उमेदवारांची संख्याही मोठी होती. महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार यांचा तर महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षांचा समावेश आहे.
तीन -तीन पक्ष एकत्र आल्याने अनेक इच्छुकांना शांत बसावे लागले. तर काही नाराज उमेदवारांनी थेट नाराजी दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नाराज उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न संबधित पक्षांकडून सुरू होते. काही मतदारसंघात यश आले तर काही मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
मतदारसंघ – उमेदवार – अर्ज मागे घेतलेले – निवडणूक रिंगणातील उमेदवार
जुन्नर – 17 – 6 -11
आंबेगाव – 17 -6 -11
खेड आळंदी – 22 – 9 -13
शिरुर – 25 – 14 – 11
दौंड – 20 – 6 – 14
इंदापूर – 34 – 10 – 24
बारामती – 32 – 9 – 23
पुरंदर – 26 – 10 – 16
भोर – 15 – 9 – 6
मावळ – 12 – 6 – 6
चिंचवड – 28 – 7 – 21
पिंपरी – 36 – 21 – 15
भोसरी – 18 – 7 – 11
वडगाव शेरी – 24 – 8 – 16
शिवाजीनगर – 20 – 7 – 13
कोथरुड – 21 – 9 -12
खडकवासला – 24 -10 -14
पर्वती – 20 – 5 -15
हडपसर – 31 – 12- 19
पुणे कॅन्टोन्मेंट – 26 -6 -20
कसबा पेठ – 14 -2 -12
एकूण – 482 – 179 -303