बेळगाव/कोल्हापूर : कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. बेळगावात आजपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. सुवर्ण सौधा येथे हा महामेळावा होणार होता. पण मेळाव्याला जातानाच एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नेते आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रेणू किल्लेकर, सतीश पाटील यांसह अनेकांना पोलिसांनी सकाळपासूनच अडवून जबरदस्तीने अटक करण्याचे सत्र सुरू केले. मेळाव्यापर्यंत पोहोचू न देण्याच्या कर्नाटक सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!, अन्याय झाला तर आंदोलन करू! अशा जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला असून त्याचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. बेळगाव अधिवेशनादरम्यान गोंधळाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे राज्यात दगडफेकीसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यात एसटी बस सर्वाधिक टार्गेट होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक ते महाराष्ट्र बस सेवाच तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बेळगाव, निपाणी बस डेपोतून महाराष्ट्रात जाणा-या बस बंद करण्यात आल्या आहे.