नवी दिल्ली – हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याचा चंग काँग्रेसने केला आहे. यापाश्र्वभूमीवर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार काँग्रेस नेतृत्त्वाने हरियणातील पराभवाचा उल्लेख करत कोणत्याही प्रकारची गटबाजी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही, अशा शब्दांत तंबी दिल्याचे समजते. मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्त्व अलर्ट मोडवर आहे. या दोन्ही समाजात सलोखा निर्माण राहिल, हे निश्चित करण्याची सूचना काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिली आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे, असेही केंद्रीय नेतृत्त्वाने दिले आहेत. या बैठकीत केंद्रातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेत्यांना तीन महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण होणार या वादात पडू नका, हा पहिला निर्देश आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्त्व ते निश्चित करेल. या विषयावर पक्षात आणि पक्षाच्या बाहेर कोणतीही गटबाजी करु नये. महाविकास आघाडीमध्ये वाद असलेल्या कोणत्याही जागांवर चर्चा करु नये. ज्या जागांवर आघाडीमध्ये वाद आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचा पक्ष त्यावर दावा करतोय त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व करेल. या जागांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीमध्ये वाद निर्माण करु नका. काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना जाहीरनाम्यावर कोणतीही चर्चा करु नका, असेही निर्देश दिले आहे. राज्यातील नेत्यांनी फक्त लोकांच्या संपर्कात राहावे. त्यांची कामे करावित. काँग्रेसने केलेल्या कामांचे मतदारांना स्मरण करुन द्यावे. फक्त सत्तारुढ पक्षांच्या टीकेवर अवलंबून राहू नका. अतिआत्मविश्वाचे बळी पडू नका, असेही राज्यातील नेत्यांना सूचना केल्या आहेत.