सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याहस्ते आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन इमारत भूमिपूजन समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांकडून बहिष्कार टाकण्यात आला. मात्र या कार्यक्रमात लवकरच राईट टू हेल्थ कायदा आणला जाईल,अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली.
लवकरच ‘राईट टू हेल्थ’ कायदा आणणार
महाराष्ट्रात येत्या काही दिवसात ‘राईट टू हेल्थ’ म्हणजेच ‘आरोग्य माझा अधिकार’ हा कायदा आणला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची असणार असून याचा मोठा फायदा जनतेला होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिंदे सरकारने मोफत उपचार सुरू केल्यानंतर आयपीडीमधील रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने तर ओपीडीमधील रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजप आमदारानंवर साधला निशाणा
या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांकडून बहिष्कार टाकण्यात आला. यानंतर तानाजी सावंत यांनी माझ्याकडे ज्या-ज्या वेळी फाईली येतात, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत त्या बघून काम न करता हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून काम करतो. अर्धवट माहितीच्या आधारावर लोकार्पण किंवा भूमिपूजनसारख्या लोकांच्या हिताच्या कामला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा मी सर्वांच्या साक्षीने निषेध करतो, असे म्हणत कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या भाजप भाजप आमदारांना चांगलेच फटकारले.