Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असला तरी अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. सातारा, सांगलीसह कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट व विजांसह पावसाचा इशारा.

Maharashtra Rain Update: राज्यात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी अनेक भागांत पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. मात्र, त्यानंतर अनेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. हा पाऊस सर्वदूर नसला तरी राज्यातील विविध भागांत आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज, २१ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागांसह हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून माघार घेतली आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा जैसलमेर, नागौर, सीकर, रोहतक, पतियाळा आणि गुरुदासपूर या भागांतून पुढे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित काही भागांतूनही मॉन्सूनच्या माघारीसाठी हवामान अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांतूनही पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून माघारी जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
महाराष्ट्रात आज सातारा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांतही पावसाची शक्यता आहे. याशिवाय बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या, मंगळवारी रायगड, सातारा घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, पुणे, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा आहे.
तसेच बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतही विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पालघर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. आज सकाळी साडेआठ वाजता हे हवामान क्षेत्र पश्चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर होते. पुढील २४ तासांत हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
त्यानंतरच्या २४ तासांत हे हवामान क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत हे क्षेत्र २३ सप्टेंबरच्या सकाळच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. या हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवसांत देशातील काही भागांतील पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.





