आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड; 27 गावांना जोडणारा मार्ग झाला बंद

काल रात्रीपासून मुंबई-ठाण्यासह कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांवर या पावसाचा परिणाम झाला आहे. या पावसामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. या पावसामुळे नदी – नाले तुडुंब भरले असून रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यादरम्यान कुडाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
कोकणात असलेल्या आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. यामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसला आहे. कुडाळ येथील माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
तसेच नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेला पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.





