Maharashtra Politics : शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

हिंगोली :- “शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी’ अशा खोचक शब्दांत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सरकार आपल्या दारी म्हणत असून, “योजना फक्त कागदावरी’ असा टोलाही त्यांनी लगाविला.
हिंगोली येथील आयोजीत निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दरांवर बोलेन, पण मी गद्दरांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायखाली ठेचले पाहिजे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, डबल इंजिन सरकार आणि आता त्यात अजित पवारांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? मालगाडी होतेय यांची. तुमच्या पक्षात कर्तृत्व नाही? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात. तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची हिंमत नाही का? आमचे वडील चोरणार, पक्ष चोरणार, पक्षातील नेतेही चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत. अरे हे कसले हिंदू, हे तर नामर्द आहेत.
दरम्यान, आगामी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकामध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याचे आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. त्यावरूनच तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठले देशप्रेम आहे? असा सवालही ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळी विचारला.
टरबूजालाही पाणी लागते…
फडणवीस यांच्यावर बोलणे मी सोडले आहे. मी मागे त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो, पण जाऊद्या. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना हे महाशय मात्र जपान दौऱ्यावर होते, असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसांचे नाव घेताच समोर उपस्थित कार्यकर्त्यांनी टरबूज..टरबूज असे म्हणण्यास सुरवात केली. त्यांनी हाच धागा पकडताना, “टरबूजालाही पाणी लागते,’ असे म्हणत त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
जिंकण्यासाठी दंगली घडवतील…
“2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार देशात दंगली घडवू शकते, याकडे लक्ष द्या. राममंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून हिंदू लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. पण हा सोहळा झाल्यानंतर हिंदू घरी परतताना एखाद्या मुस्लिम भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.





