ठसका : (मारुती जैनक) : निवडणूक म्हंजे आमच्यासाठी चंगळोत्सव. ती लागली रे लागली, की आम्हास चेकाळा भरला नाही तर नवलच. आयच्यान आमच्या उरा-पोटात थुई थुईच व्हतं! मग ती कोणती का असेना. नगरसेवकांची असो की आमदारांची; सार्वत्रिक असो, की पोट. आमच्या पोटाची भलाई एवढंच आमचं ध्येय. लोकशाहीच्या या उत्सवात आमच्यासारख्यांच्या पोटाची चंगळच चंगळ. म्हणूनशानं हा मंगल उत्सव पुन्ह्यांदा-पुन्ह्यांदा येतच राहो, असे आम्हास वाटण्यात गैर ते काय?..त्यात आमचा सोभाव निःपक्षपाती. “सारा हिंदोस्था हमारा’ याच नुसार सारे पक्षही आमचेच. आज या पक्षाच्या प्रचारात, तर उद्या दुसऱ्या. परवा आणखी तिसऱ्याच; पण हा निःपक्षपातीपणाही तितकाच जोखमीचा बरं! नाही म्हंजे, आज कोणत्या पक्षात जेवणावळीचा बेत काय ते बघुनच आपली निष्ठा पाजळावी लागते. यातच तर आमचा खराखुरा शहाणपणा. अन् हा बेत उमगून घ्यायचा म्हंजे गनिमीकावा हे एकमेव अस्त्र. आहे की, नाही जोखीम? जिथं फक्कड मेवा, तिथं आमची सेवा. आठ-पंधरा दिवस कस्सं निघून जातात, हे कळतंच नाही! सध्या आम्ही याच प्रचार मोहिमेत व्यग्र आहोत. काल आम्ही ज्या पक्षाच्या सेवेत होतो, तिथं मेनूही तसा खासाच व्हता. गरमा-गरम भाकरी अन् मटण. मग काय हॅं ताव मारला, की दिलखूश. आधीच सक्काळपासून घोषणा दिऊन आणि पायपीट करून पोटात कावळे काव काव करत व्हत्ये. सगळी कसरच भरून काढली. पण भर पंगतीत एका निष्ठावान कार्यकर्त्याने आम्हास हेरले. परवा आम्ही दुसऱ्याचाच प्रचार करत व्हतो, हे त्याच्या ध्यानी आलेलं. भरल्या ताटावरच त्यानं आम्हास याचा जाब विचारला. त्या जाबानं आम्हास ठसकाच लागला. शेवटाचा घास कस्साबस्सा गिळून आम्ही तिथून काढता पाय घेतला. आता या पक्षात पुन्हा न फिरकणेच बरे, असा निर्धार करून आम्ही दुसऱ्या दिवशी दुसरा पक्ष धरला. निष्ठावानाचा आव आणत आम्ही सक्काळी सक्काळी पक्षाच्या कार्यालयात धडक मारली. प्रचार फेरीस सुरुवात होण्याआधीच खमंग नाष्टा तय्यार व्हता. त्या वासानंच तोंडाला पाणी सुटलं. प्लेट भरून घेणार तोच इथंही एका कार्यकर्त्यानं आम्हास ओळखलं. त्यानं आमची गचंडी पकडत आमच्या निष्ठेची लक्तरे फाडली. आता आमची भंबेरीच उडाली. आमची “राजकारणनीती’ इथं कोणासच मान्य नसावी, हे आम्ही जाणले. कसली ही लोकशाही, असा विचार आमच्या बापुड्या डोस्क्यात आला. आब्रुचे आणखी खोबरे नको म्हणून आम्ही गुमान तिथून बाहेर पडलो. “राजकारण गेलं चुलीत’ अस्सं म्हणत थेट घरचा रस्ता धरला.