रत्नागिरी : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Politics) घोषणा झाल्यानंतर राज्यभर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती व आघाड्यांसाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असताना, राजीनामे व पक्षांतराची लाट उसळली आहे. सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांनी सोईच्या पक्षात प्रवेश केला असतानाच, कोकणातील भाजपला आता सर्वात मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यामुळे कोकणातील भाजपचा विस्तार धोक्यात सापडला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा: पक्षाला विस्ताराची अपेक्षा भाजपाने कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागात पक्षाचा पाया भक्कम करण्यावर भर आहे. मात्र, ऐन या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा सोपवला. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत यांनी दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी सांभाळताना पक्षाला मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तरीही, निवडणुकांच्या तोंडावर हा राजीनामा भाजपसाठी अपेक्षित नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमके कारण काय? लेकीच्या शिवसेना उमेदवारीमुळे नैतिकता? राजेश सावंत हे कोकणातील भाजपचे प्रमुख चेहरे मानले जातात. पक्षाने त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती, ज्यात दक्षिण रत्नागिरीचा विशेष भार होता. मात्र, राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विश्वसनीय वृत्तांनुसार, सावंत यांची कन्या शिवानी सावंत माने ही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून तयारी करत आहे. नुकताच त्यांचे सासरे (शिवानींचे सासरे) बाळ माने हेही उबाठा गटात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत कुटुंबाला आलेल्या ‘धर्मसंकटातून’ बाहेर पडण्यासाठी आणि कौटुंबिक-राजकीय संघर्ष टाळण्यासाठी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. सावंत यांनी स्वतः सांगितले की, “पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको, लोकांनी काही बोलू नये, म्हणून मी राजीनामा देत आहे.” आता प्रश्न असा आहे की, राजीनामा दिल्यानंतर सावंत हे भाजपमध्ये राहून कोणाचा प्रचार करणार? की पूर्णतः पक्षबदल घडणार? रवींद्र चव्हाणांची बैठक रद्द; चर्चांना उधाण राजीनाम्याची माहिती मिळताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रत्नागिरी शहरात आयोजित कार्यकर्ता बैठक तात्काळ रद्द करण्यात आली. यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करून निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोकणातील निवडणुकीत भाजपला आता दक्षिण रत्नागिरीत अडचणी येऊ शकतात, कारण सावंत यांचा प्रभाव तेथे मोठा आहे. या राजीनाम्यामुळे कोकणातील राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती-आघाड्यांमुळे आता नव्या समीकरणांची रचना होत असल्याचे दिसत आहे.