प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई करीत तीन अवैध एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत तब्बल ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा व वितरण रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली असून, सध्या राज्यात सात विभागीय कृती गट कार्यरत आहेत. त्याच अनुषंगाने कोकण कृती गटाने ही मोठी कारवाई केली. दिनांक २१ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथे पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या जुन्या बस डेपो परिसरात छापा टाकून आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत अंदाजे १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये) जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान व तांत्रिक विश्लेषणातून बेळगाव येथे राहणारा प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग्ज तयार करीत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात बंगळुरू शहरातील तीन ठिकाणी एमडी ड्रग्जचे कारखाने सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने बंगळुरू येथे जाऊन सूरज रमेश यादव व मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी भागातील ‘आर.जे. इव्हेंट’ नावाची फॅक्टरी तसेच येरपनाहळी कन्नूर परिसरातील लोकवस्तीत असलेल्या आरसीसी घरामध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. या तिन्ही ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी ४ किलो १०० ग्रॅम एमडी, द्रव स्वरूपातील १७ किलो एमडी असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, यंत्रसामग्री व विविध रसायने जप्त केली. तिन्ही कारखाने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारखान्यांमधून तयार होणारे एमडी ड्रग्ज भारतातील विविध राज्यांमध्ये वितरित केले जात होते. ड्रग्ज विक्रीतून आरोपींनी बंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन महत्त्वाच्या आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुणे कृती गटाचे पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, उप अधीक्षक रामचंद्र मोहिते व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, अंमली पदार्थांबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास नागरिकांनी ०७२१ ८००००७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने केले आहे.