बीड – कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला.
यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला तीन महिन्यासाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली होती. मात्र कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात रोज कोरोना रुग्ण वाढत आहे.
काल (दि.17) बीड जिल्ह्यात तब्बल सव्वा दोनशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अचानक आंदोलक गाडी समोर आले.
अचानक गाडी समोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली. यावेळी आंदोलकांना गाडीच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.