Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडेंना जामीन मंजूर; काय आहे प्रकरण?

बीड – राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पूस येथील संत जगमित्र सहकारी साखर कारखान्याच्या वादाप्रकरणी त्यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. ते आज न्यायालयासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज मंजूर करत अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा खासगी मालकीच्या जगमित्र शुगर प्रायव्हेट लिमिटेड ही प्रस्तावित जागा आहे. या साखर कारखान्यासाठी शेतकरी मुंजा गित्ते यांची आठ एकर जमीन कारखान्यासाठी घेण्यात आली होती. या जमिनीच्या व्यवहाराचे 40 लाख रुपये मुंजा गीते यांना या साखर कारखान्याकडून येणे होते. मात्र त्यासाठीचा दिलेला धनादेश न वठल्याने त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशावरून 18 मे 2018 ला धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणांमध्ये यापूर्वीच वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांना जामीन मिळालेला आहे.





