औरंगाबाद – आंतरराष्ट्रीय उद्योगांना गुंतवणूकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणे हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. याअनुषंगाने ऑरीक सिटीमध्ये उद्योगांना गंतुवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. करोना कालावधीत देखील राज्यातील उद्योग सुरु राहीले. यातून महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही आणि थांबणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. औरंगाबाद शहरात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत ऑरिक सिटीत कॉनक्लेवचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीसाठी संवाद व सहकार्य तसेच पायाभूत सुविधांच्या उपलब्धेतसह मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमातून आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीस सहकार्य आणि आवाहन करण्यात येत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. गुंतवणूकदारासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नाही. पर्यटनात व उद्योगात आघाडीवर असलेले शहर म्हणून औरंगाबादने स्वत:ची ओळख बनवली असून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लवकरच आंतराष्ट्रीय उच्चायुक्तांसोबत मंत्रालय स्तरावर बैठक नियोजित आहे. तसेच रोजगार आणि राज्यातून निर्यातक्षम बाजारपेठ मिळण्यसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.