IAS Transferred : राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री जारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांना मंजुरी दिली आहे. राज्यातील प्रशासनिक कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात नियमितपणे सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असून याच पार्श्वभूमीवर ही नवी बदली करण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली? विजय सूर्यवंशी (IAS 2006) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बापू पवार (IAS 2015) सहसचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मुंबई यांची महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश आव्हाड (IAS 2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही बदल्या याआधी गेल्या आठवड्यातही दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:२००९) कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची यशदा, पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश नवाल (IAS:RR:२०१०) केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आणि सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात प्रशासनिक पातळीवर अधिक गतिमान कामकाजासाठी या बदल्या करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.