महाराष्ट्र सरकारचे मोठं पाऊल! एन. डी. स्टुडिओला मिळणार नवसंजीवनी; १३० कोटींच्या निधीचे हस्तांतरण पूर्ण

N.D.Studio | दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे स्वप्न असलेल्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ हा आता महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाने परिचलनासाठी ताब्यात घेतला असून काल दि. २५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते एनडी आर्ट वर्ल्ड या संस्थेस १३० कोटींचा धनादेश देऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार, उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषद सभापती राम शिंदे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
हा स्टुडिओ दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी स्थापन केला होता आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन, मुंबई येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपक्रमांतर्गत क्लॅप बोर्ड वाजवून एनडी स्टुडिओचा प्रतिकात्मक शुभारंभ केला.
तसेच, चित्रिकरणासाठी आवश्यक सर्व परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी प्रणाली (2.0)’ चे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि नितीन देसाई यांचा वारसा जपला जाणार आहे.
चित्रीकरणापुरता मर्यादित न राहता….
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जानेवारी 2025 मध्ये एनडी स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचे निर्देश दिले होते. या योजनेचा उद्देश स्टुडिओला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, त्याचा व्यावसायिक वापर वाढवणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे.
स्टुडिओ केवळ चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणापुरता मर्यादित न राहता, वेब मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणारा केंद्र बनवण्याचे नियोजन आहे. रिकाम्या जागांचा कार्यक्षम वापर आणि नवीन सुविधा जोडून त्याची आकर्षकता वाढवली जाणार आहे.
View this post on Instagram
नितीन देसाई यांचे योगदान
नितीन चंद्रकांत देसाई हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर) होते, ज्यांनी आपल्या सर्जनशीलतेने आणि कल्पकतेने अनेक चित्रपटांना अविस्मरणीय रूप दिले. त्यांचे योगदान प्रामुख्याने चित्रपटांच्या सेट डिझाइनिंग, पार्श्वभूमी निर्मिती आणि दृश्यात्मक सौंदर्यातून दिसून येते. त्यांनी हिंदी चित्रपटांपासून ते मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांपर्यंत विविध भाषांमध्ये काम केले.





