महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: आता दुकाने आणि हॉटेल्स 24 तास खुली राहणार… पहा GR

मुंबई : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत राज्यातील दुकाने, निवासी हॉटेले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटरे, सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा आणि इतर आस्थापना (मद्यविक्री वगळता) आता २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे. या आस्थापनांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा कायम राहतील, असे शासनाच्या ताज्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर रोजी हे परीपत्रक शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शासन परिपत्रकातील ठळक मुद्दे –
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ च्या कलम १६ (१) (ख) नुसार, आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस खुली ठेवता येऊ शकते, परंतु प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून किमान २४ तास सलग साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे. तसेच, कलम २ (२) मध्ये “दिवस” म्हणजे मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी असा उल्लेख आहे. यामुळे, मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांशिवाय इतर सर्व आस्थापना २४ तास कार्यरत ठेवण्यास कोणतेही बंधन नाही.
शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. ३१ जानेवारी २०२० रोजीच्या नवीन अधिसूचनेतून थिएटरे आणि सिनेमा प्रदर्शित करणारी गृहे यांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे केवळ मद्यविक्रीशी संबंधित आस्थापनांवरच वेळेचे निर्बंध लागू राहतील.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510011205158410.pdf
स्थानिक प्रशासनाच्या तक्रारींवर कारवाई –
राज्यातील काही स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाकडून मद्यविक्री न करणाऱ्या आस्थापनांना २४ तास खुली ठेवण्यास अडथळा आणला जात असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवला होता. या तक्रारींची दखल घेत शासनाने अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाला या तरतुदींची माहिती देण्यासाठी शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मद्यविक्री आस्थापनांवर कायम निर्बंध –
शासनाने स्पष्ट केले आहे की, मद्यविक्री आणि मद्यपुरवठा करणाऱ्या आस्थापनांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी नाही. या आस्थापनांना १९ डिसेंबर २०१७ च्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या वेळांचे पालन करावे लागेल.उद्योजकांचा दिलासा
या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे, थिएटरे आणि इतर आस्थापनांना २४ तास व्यवसाय करण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे रात्रीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. तथापि, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटीच्या तरतुदींचे पालन करणे आस्थापनांना बंधनकारक राहील.
या शासन निर्णयाचा संकेतांक २०२५१००११२०५१५८४१० असून, तो डिजिटल स्वाक्षरीसह साक्षांकित करण्यात आला आहे. हा निर्णय स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग आणि संबंधित विभागांना काटेकोरपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






