मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला असून टी-शर्ट, जीन्स आणि स्लीपर घालून कार्यालयात येणास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहेत. शासनाच्या या निर्णयाचे मंत्रालय अधिकारी, कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.
कार्यालयात काम करणारे बरेचसे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.
Maharashtra Government asks State Government employees and contractual staff to not wear jeans or t-shirt in the Secretariat and Government offices; instructs them to wear appropriate formal clothes, to appear professional. pic.twitter.com/BFxi8HIT9F
— ANI (@ANI) December 11, 2020
सरकारी कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या कामकाजावरही परिणाम होतो. या बाबींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच पेहराव कसा असावा यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे –
1) जीन्स, टी-शर्ट, गडद रंगाचे तसेच चित्रविचित्र नक्षिकाम\चीत्रे असलेले कपडे परिधान करू नयेत.
2) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एकदा शुक्रवारी खादी कपड्याचा वापर करावा.
3) महिलांनी शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा. तर पुरूषांनी बूट, सॅन्डलचा वापर करावा.
4) स्लिपरचा वापर करू नये.
5) महिलांनी साडी, सलवार\ चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅंट व त्यावर कुर्ता किंवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरूषांनी शर्ट, पॅन्ट\ट्राउझर पॅंट असा पेहराव करावा.
6) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व निटनेटका असावा.