रायगड : शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरेंना साथ देणाऱ्या कोकण पट्ट्याने यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंची साथ सोडल्याचे दिसले आहे. कोकणातील १५ जागांपैकी तब्बल १३ जागांवर महायुतीने सरशी मिळवली आहे. यात विशेष म्हणजे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश व निलेश यांनी अनुक्रमे भाजप व शिंदेसेनेकडून कणकवली व कुडाळ मतदारसंघातून निवडणुक लढवताना ठाकरे गटाच्या संदेश पारकर व वैभव नाईक यांचा दणदणीत पराभव केला आहे. कोकण पट्ट्यातील १५ पैकी सर्वाधिक ८ जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तर ४ जागांवर भाजपने व २ जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला भास्कर जाधव यांच्या माध्यमातून केवळ गुहागरची जागा राखण्यात यश मिळाले आहे. जाधवांनी येथे राजेश बंडेल यांचा पराभव केला आहे. निलेश राणेंशिवाय शिंदेंच्या विजयी उमेदवारांमध्ये रामदास कदम(दापोली), उदय सामंत(रत्नागिरी), किरण सामंत(राजापूर), दीपक केसरकर(सावंतवाडी), सदाशिव थोरवे (कर्जत), भरत गोगावले(महाड), महेंद्र दळवी(अलिबाग) यांचा समावेश आहे. तर भारजपाकडून नितेश यांच्याव्यतिरिक्त रविशेठ पाटील (पेण), महेश बालदी(उरण), प्रशांत ठाकूर(पनवेल) यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, कुणाच्या ध्यानीमनी नसताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही शेखर निकम(चिपळून) व आदीती तटकरे(श्रीवर्धन) या जागांवर विजय मिळविण्यात यश मिळविले आहे.