Maharashtra Congress new president : काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ते नाना पटोले यांची जागा घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे 57 वर्षीय सपकाळ हे नाना पटोले यांची जागा घेतील. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी घेत पटोले यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. चार वर्षे ते या पदावर राहिले. त्याचवेळी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यास खरगे यांनी मान्यता दिली. कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ? बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेचा एक भाग आहेत. स्थानिक स्वराज्याच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या काँग्रेसशी संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सपकाळ हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिवही होते. त्यांनी गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यातही पक्षासाठी काम केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारूण पराभव झाल्यानंतर नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा पराभव केला. काँग्रेस पक्षाने राज्यात 103 जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना फक्त 16 जागा जिंकता आल्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव झाला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. साकोली मतदारसंघातून स्वत: निवडणूक लढवलेले नाना पटोले 208 मतांनी विजयी झाले. 2021 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली आणि 13 जागा जिंकल्या. मात्र विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा देऊ केला, तो पक्षाने स्वीकारला.