महाराष्ट्र काँग्रेस: विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ‘या’ दोन आमदारांची केली हकालपट्टी

नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जीशान सिद्दिकी आणि जितेश अंतापूरकर यांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत क्राॅस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले होते. यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. आता दोन्ही आमदारांची पक्षाने हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी झीशान सिद्दीकीचे वडील बाबा सिद्दीक यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच नुकत्याच झालेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेवेळी झीशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांचे स्वागत केले होते.
यावरून ते अजित पवार गटात जाणार असल्याचे जवळपास निश्िचत झाले आहे. तसेच जितेश अंतापूरकर यांनी आजच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.





