मुंबई ( Mahayuti Seat Sharing ) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये काही जागांवर अद्यापही तिढा कायम असल्याचं दिसत आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते आज दिल्लीदरबारी पोहोचले आहेत. येथे अमित शहा यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये भाजपचे निवडणूक चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतही जागांवरून तिढा महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन प्रमुख घटक आहेत. या तीन पक्षांमध्ये, काही महत्त्वाच्या जागांवर अद्याप तिढा कायम आहे. प्राप्त माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागांवर दावा करण्यात येत असल्यानेच जागावाटप रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर आज, तिन्ही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जागावाटपावर खलबतं होणार आहेत. दिल्लीतील बैठक महत्त्वाची | Mahayuti Seat Sharing या महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला रवाना झाले आहेत. तिन्ही नेत्यांची शाह यांच्यासोबत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होईल. काही जागांवर तिन्ही पक्षांचे दावे असल्यामुळे चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत महायुतीची आगामी निवडणूक रणनीती ठरणार आहे. लवकरच उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता | Mahayuti Seat Sharing लोकसभा निवडणुकीत जागावाटप रेंगाळल्यामुळे महायुतीला अनेक मतदारसंघात फटका बसला होता. याच चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या वेळी महायुतीच्या नेत्यांनी लवकरात लवकर जागावाटप अंतिम करून उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे ठरवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत महायुतीकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.