गडचिरोली : नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली असून महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ आज सुमारे आठ तास नक्षलीसोबत चकमक झाली. गडचिरोली जिल्ह्यातील कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक पुरुष आणि तीन महिला यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी शस्त्रसाठाही सापडला आहे. गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली सी-60 ची 19 पथके आणि सीआरपीएफची 2 पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली. यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी या जंगल परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली. त्याच वेळी माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. जवळपास आठ तास ही चकमक चालली. त्यानंतर शोध मोहिम राबवली गेली. त्यात 4 जहाल माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यात 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता. याशिवाय घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या भागात उर्वरित नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.