Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात शपथविधी समारोह पार पडणार आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यामुळेच या तिन्ही पक्षांनी 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ निश्चित केलं आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणींना स्थान मिळालं, तुम्हाला माहिती आहे का? किती महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे? एकदा पाहाच…. देवेंद्र फडणवीसांच्या नवीन मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने एका ही महिलेला संधी दिलेली नाही. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी दिली आहे. मागील मंत्री मंडळात सुद्धा त्यांची वर्णी लागली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत 12 जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात एका ही लाडक्या बहिणीला संधी देण्यात आली नसल्याचे दिसून येते. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला या विजयी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या भाजपाकडे आहे. भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार आहेत.