मुंबई : लंडनमधील मराठी लोकांना आता स्वतःचे सांस्कृतिक केंद्र मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची एक जुनी इमारत खरेदी करण्यासाठी आणि तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दिली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ ही परदेशातील सर्वात जुनी मराठी संस्था मानली जाते. 1932 साली महात्मा गांधींचे सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी तिची स्थापना केली. स्थापनेपासूनच मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक धाग्यांनी एकत्र आणण्याचे कार्य हे मंडळ करत आहे. गेली 93 वर्षे ते विविध सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांद्वारे मराठी अस्मिता जपण्यात अग्रेसर राहिले आहे. सध्या लंडन आणि परिसरात जवळपास एक लाखाहून अधिक मराठी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. पण, मंडळाचे सर्व कार्यक्रम आतापर्यंत भाड्याच्या जागांवरच पार पडत होते. त्यामुळे स्वतःचे कायमस्वरूपी सांस्कृतिक भवन असावे, अशी मागणी समाजातून सातत्याने केली जात होती. गेल्या आठवड्यात मंडळाच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांची भेट घेऊन शासनाकडून आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यावर तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत दिला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने या संस्थेला 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र भवन हे युके आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. या भवनामुळे मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत आणि यूके यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करता येईल. यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्यास मदत होईल. – अजित पवार, उपमुख्यमंत्री