Maharashtra Assembly Voting: मतदानादरम्यान कुठे राडा, तोडफोड, हाणामारी, दमदाटी झाली? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election 2024 – महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर आता मतमोजणी निकाल 23 तारखेला जाहीर होणार आहेत. आज मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राडा पहायला मिळाला.

वर्ध्यात कराळे मास्तरांना मारहाण –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नीतेश कराळे यांना वर्धा मतदारसंघातील उमरी मेघे येथे मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी ही मारहाण भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत केलेला गदारोळ इंदापूरकर विसरलेले नाहीत. पुन्हा विधानसभेतही तशीच अरेरावीची भाषा आणि दमदाटी ही इथल्या आमदाराकडून होतेय हे खेदजनक आहे. हे दबावतंत्र लोकशाही स्वीकारणार नाही. pic.twitter.com/OVnglbhUv0
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
अजित पवार गटाच्या आमदाराकडून दमदाटी-
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भरणे यांनी मतदारांना कथित दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शरद पवार गटाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात संविधान विरोधी घटकांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड केली आणि निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..! pic.twitter.com/wmV1vAY7be
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
घाटनांदूरच्या मतदान केंद्रावर तोडफोड –
अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत त्याचा निषेध केला आहे.
छगन भुजबळांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते तथा येवला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ यांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले. भुजबळ अनेकवेळा मतदान केंद्राला कसे भेट देऊ शकतात असा दावा करत त्यांनी त्यांच्याशी वाद घातला.
शिर्डीत बनावट मतदान, काँग्रेस नेत्याचा आरोप –
काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात शिर्डीत बनावट मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीनिवास यांनी एका मुलीचा व्हिडिओ शेअर करत ही मुलगी धुळ्याची असून शिर्डीत मतदान करत असल्याचे सांगितले. शिर्डी धुळ्यापासून 300 किमी अंतरावर आहे.
रामनगरकरांचा मतदानावर बहिष्कार –
कन्नड तालुक्यातील रामनगर येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली आहे. हे गावकरी मुलभूत सुविधांसाठी आक्रमक झालेत.
मध्य नागपुरात ईव्हीएममध्ये बिघाड –
मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदार खोळंबले होते. मध्य नागपूर मतदान केंद्रातील नाईक तलावाजवळील संत कबीर प्राथमिक शाळा केंद्रातील खोली क्रमांक २, ३, ४ येथील ईव्हीएम बंद असल्याची मतदारांनी तक्रार केली. तर या परिसरातील महात्मा फुले शाळेतीलही एक ईव्हीएम बंद होती. यंत्रात बिघाडामुळे मतदानाला उशीर होत असल्याने वाट पाहून काही कामगारांनी काढता पाय घेतल्याची माहिती आहे.
धुळ्यात 98 कोटी रुपयांची 10 हजार किलो चांदी पकडली –
धुळे येथे निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकाने 10 हजार किलो चांदी पकडली असून त्याचे मूल्य अंदाजे 98 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चौकशीनंतर ही चांदी बँकेची असल्याची चर्चा असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
धुळ्यात भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये मारहाण –
धुळे शहरातील एका मतदान केंद्रावर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
नांदगाव मतदारसंघात राडा, सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी –
नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे हे आमनेसामने आल्याने वाद झाला. वाद वाढल्यावर सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना तुझा मर्डर आज फिक्स आहे, अशी धमकी दिली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही उमेदवारांना समज दिली.
यावेळी समीर भुजबळांनी आरोप केला की, सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामगारांना डांबून ठेवले होते. समीर भुजबळ यांनी जाऊन सर्व लोक पकडले, तेथे पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. यावर सुहास कांदे यांनी येऊन समीर भुजबळ यांना तुझा खून करून टाकण्याची दिली धमकी देत पोलिसांनादेखील अरेरावी केल्याचा आरोप केला आहे.
परळी मतदारसंघातील धर्मापुरीत सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदानाचा आरोप-
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारी चक्क CCTV कॅमेऱ्याचे कनेक्शन कट करुन बोगस मतदार करायला दबावापोटी मदत करत असल्याचा आरोप आहे. परळी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे प्रकार थांबवण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता मुंडे समर्थकांकडून उमेदवारावास दमदाटी करण्यात आली. असा आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.





