Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची एंट्री

मालेगाव : राज्यातील निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यादरम्यान शरद पवारांची साथ सोडत एका नेत्याने स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. आता राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री झाल्याने निवडणूक अजून रंगतदार होणार आहे. मालेगाव शहराचे माजी आमदार आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र म्हणजेच इस्लाम पक्षाची स्थापना केली आहे.
‘इस्लाम’ पक्षाचे संस्थापक आसिफ शेख कोण आहेत?
आसिफ शेख हे मालेगाव मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2014 मध्ये चुरशीच्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले. आसिफ शेख यांनी 2019 ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.मात्र त्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिले गेल्या महिन्यात शरद पवारांची साथ सोडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी आता इस्लाम या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून आसिफ शेख निवडणूक लढवणार आहेत.
मालेगावच्या मध्य मतदारसंघात समाजवादी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नुकतंच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या दौऱ्यात पाच वेळा आमदार राहिलेले निहाल अहमद यांची मुलगी शान-ए हिंद यांना तिकीट जाहीर केलंय. तर काँग्रेसकडून एजाज बेग हे उत्सुक आहेत. मालेगावची गड राखण्यात काँग्रेसला यश मिळते का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





