Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
या सगळ्या हालचाली सुरु आहेत. असे असताना दुसरीकडे सत्तेमध्ये असणाऱ्या प्रत्येक घटक पक्षाला कसा वाटा मिळणार यासंदर्भातील फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता कोणत्या गटाला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
प्रत्येक सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद असा विचार केल्यास 132 जागा जिंकणाऱ्या भाजपाला नव्या सरकारमध्ये 22 ते 24 मंत्रिपदं मिळतील. 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या पक्षाला 10 ते 12 मंत्रिपदं मिळू शकतात. त्याचप्रमाणे 41 जागा मिळवणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाला एकूण 8 ते 10 मंत्रिपदं मिळतील असा अंदाज आहे.
तर दुसरीकडे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणं बाकी आहे. असं असतानाच या तिन्ही नेत्यांच्या संमतीने मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करुन तो वरिष्ठांना कळवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.