बीडचा आदर्श उद्ध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा; शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

बीड : सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज परळीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांची ही परळीमध्ये पहिलीच सभा होती. या सभेतून त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार?
परळीने जीवा भावाचा सहकारी दिला होता. महाराष्ट्राला वीज देण्याचं काम या परळीतून होतं अलीकडच्या काळात परळीला काय झालं आहे ते माहीत नाही परळीत गुंडागिरी वाढली आहे. काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात मदत केली होती. बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम मला दिले होते, दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, मात्र काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत पवार यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
परळीकरांना केले आवाहन
पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला. ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.





