Maharashtra Assembly Election 2024 : नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, त्याचा विजय निश्चित वाटतो – छगन भुजबळ

नाशिक – नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर भुजबळ जरी अपक्ष लढत असले तरी देखील आम्ही लक्ष्मीपूजनासाठी एकत्र येणार आहोत, असे भुजबळ म्हणाले. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीसाठीच दिवाळी गोड असणार, असा विश्वास देखिल त्यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, निवडणुकीत शिव्या आणि दादागिरी केली तरी कायदा आपले काम करेल. नांदगावमध्ये जे घडले ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचे असणार आहे. समीर भुजबळ यांना उभे राहण्याआधी मी सांगितले होते की राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी देखील हे मान्य करत अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, नांदगावची लोक दहशतवादाला खूप कंटाळली आहेत. भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीर भुजबळ यांनी त्यासाठीच दिले आहे. नांदगावमध्ये किती दहशत आहे हे ऑडिओ आणि व्हिडिओमुळे जगासमोर आले आहेत. सध्याचा नांदगावकरांचा कल समीर भाऊंच्या बाजूने झुकतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मला निश्चित वाटतो, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.





