मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024साठी महायुतीतील भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. ती आज उद्या जाहीर होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार यांनी उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप केल्या माहिती समोर आली आहे. 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Election 2024) यांना मिळाले एबी फॉर्म – संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके, नितीन पवार, इंद्रनील नाईक, बाळासाहेब आजबे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर भरत गावित म्हणाले की, मला एबी फॉर्म दिलेला आहे. माझा मतदारसंघ हा राखीव आहे. नवापूर मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. मी नक्की जिंकून येणार आहे. मी येत्या 24 तारखेला फॉर्म भरणार आहे. जनता जनार्दन माझा विजय नक्की करेल. तर हिरामण खोसकर म्हणाले की, काँग्रेसकडे आम्ही दोन महिने जात होतो. पण त्यांनी ऐकले नाही. मग आमची फसवणूक होईल असं वाटलं आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो. सकाळी 8 वाजता मला फोन आला आणि आता लगेच आम्ही या ठिकाणी आलो. दादांनी मतदारसंघात काम करायला सांगितलं आहे. सगळे लोक एका बाजूला आलेत तर ती बंडखोरी राहिली नाही. विरोधकांची यादी अजून येत नाही. पण विजय आमचा होणार आहे, असे त्यांनी म्हटले.