“महाराष्ट्राच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी वचनबद्ध’, अखिलेश यादवांकडून महायुतीविरोधात ऐक्याचे आवाहन

लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी महाराष्ट्राच्या सत्तेवरून महायुतीला हटवण्यासाठी ऐक्याचे आवाहन केले. तसेच, महाराष्ट्राच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी, सकारात्मक बदल घडवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्यास सप उत्सुक आहे. त्या पार्श्वभूमीवर, अखिलेश यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले.
ते त्यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले. त्यांनी सत्तारूढ महायुतीवर आणि प्रामुख्याने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. जनतेच्या जागरूकतेमुळे आताची निवडणूक महाराष्ट्राला भाजपच्या कारस्थानांनी व्यापलेल्या नकारात्मक राजकारणापासून मुक्ती देईल. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू संपवण्याचे भाजपचे कारस्थान जनतेसमोर उघड झाले आहे.
त्या पक्षाने महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक सलोखा, बंधूभावाची आणि राजकीय पक्षांचीही तोडफोड केली. महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कमजोर बनवण्याची भाजपची इच्छा आहे. त्यामागे महाराष्ट्राच्या हातातील देशाच्या आर्थिक नेतृत्वाचा लगाम हिसकावून दुसरीकडे सोपवण्याचा हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्राचा मान-सन्मान, रोजगार, व्यापार, व्यवसाय आदींचे शत्रू असणाऱ्यांना जनता हरवेल. संयुक्त आणि संघटित राजकीय रणनीतीमुळे महायुतीच्या महादु:खी काळाचा अंत होईल, असे भाकीत अखिलेश यांनी केले. सपने मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) महाराष्ट्रात २ जागा जिंकल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडीशी समझोता करून अधिक जागा लढवण्यासाठी तो पक्ष उत्सुक आहे. सपने आतापर्यंत ५ उमेदवार जाहीरही केले आहेत. महाविकास आघाडी सपला किती जागा देणार ते अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही.





