गडचिरोली – जेव्हा तुमच्यात क्षमता असते, पण वागणूक दुय्यम दर्जाची मिळते तेव्हा त्याचा अजित पवार होतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भुमिकचे समर्थन केले. एकनाथ शिंदे म्हणाले, आज अजितदादा ज्या परिस्थितीतून जात आहेत मी पण त्या स्थितीतून गेलो आहे. राजकीय जीवनात तोंडात अंजीर आणि हातात खंजीर ठेवणारी माणसे बेभरवशाची असतात. क्षमता असूनदेखील दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने मी वेगळी वाट धरली, अजित पवार यांनीदेखील तेच केले. घरी बसून कामे होत नाहीत. त्यासाठी बाहेर पडावे लागते, असा टोला लगावत शिंदे यांनी अजित पवार यांच्या समावेशामुळे सरकार अधिक जोमाने काम करेल, असे सांगितले. सोबतच त्यांनी प्रफुल पटेल लवकरच यावर पुस्तक लिहिणार असल्याचा गौप्यस्फोटदेखील केला.