Vijay Sethupathi : ‘महाराजा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला? विजय सेतुपतीने दिली मोठी अपडेट
Vijay Sethupathi : सिनेमातील उत्कंठावर्धक पटकथा, अनपेक्षित वळणं आणि क्लायमॅक्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. विशेषतः सिनेमाचा शेवट अनेकांसाठी धक्कादायक आणि अनपेक्षित ठरला.

Vijay Sethupathi : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपतीचा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘महाराजा’ सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. निओ-नॉयर ॲक्शन थ्रिलर प्रकारातील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही या सिनेमाला देश-विदेशातील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
विजय सेतुपतीने साकारलेली मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजली. आता ‘महाराजा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय सिनेमाच्या सिक्वेलवर काम सुरू असून, खुद्द विजय सेतुपतीने ‘महाराजा २’बाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘महाराजा’ची कथा चेन्नईतील एका न्हाव्याभोवती फिरते. चोरीला गेलेली कचऱ्याची बादली परत मिळवण्यासाठी विजय सेतुपतीने साकारलेलं पात्र पोलीस ठाण्यात धाव घेतं. सुरुवातीला अगदी साधी वाटणारी ही घटना पुढे जाताना एका गुंतागुंतीच्या आणि थरारक कथानकाचं रूप धारण करते.
सिनेमातील उत्कंठावर्धक पटकथा, अनपेक्षित वळणं आणि क्लायमॅक्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. विशेषतः सिनेमाचा शेवट अनेकांसाठी धक्कादायक आणि अनपेक्षित ठरला.
‘महाराजा २’च्या कथेबाबत विजयने काय सांगितलं?
एका कार्यक्रमात बोलताना विजय सेतुपतीने ‘महाराजा २’बाबत महत्त्वाची माहिती दिली. दिग्दर्शक निथिलन स्वामिनाथन यांच्या लेखनाचं कौतुक करताना विजयने सांगितलं की, निथिलन यांनी त्याला सिक्वेलची कथा ऐकवली असून ती त्याला खूप आवडली आहे.
“निथिलन एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे. त्याची लेखनशैली उत्कृष्ट आहे. त्याने अलीकडेच मला ‘महाराजा २’ची कथा ऐकवली. ती खूप सुंदर आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. सिक्वेलचं काम प्राथमिक चर्चांच्या पुढे गेलं असून, संपूर्ण कथा तयार आहे.” असं विजय सेतुपतीने सांगितलं.
दरम्यान, ‘महाराजा २’मध्ये विजय सेतुपतीच्या भूमिकेचं स्वरूप काय असेल आणि पहिल्या भागातील कथेशी सिक्वेलचा नेमका संबंध कसा जोडला जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, विजयने स्वतः सिक्वेलची कथा तयार असल्याचं सांगितल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.





