पाटणा – बिहारमध्ये महापुराचा कहर सुरूच आहे. राज्यातील जवळपास सर्वच प्रमख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांतील तब्बल 38 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सरकारकडून बचावकार्य सुरू आहे. जलसंधारण विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, कोसी नदीची पाणीपातळी खूपच वाढली आहे. वीरपूर जवळ गुरुवारी सकाळी 6 वाजता कोसी नदीची पाणीपातळी 1.83 लाख क्यूसेक होती तर 8 वाजता 1.86 लाख क्यूसेक एवढी वाढली. त्याचबरोबर गंडक नदीची पाणीपातळी स्थिर झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. गंगा, बागमती, बुढी गंडक, कमला बलान, महानंदा या नद्यांनी अनेक भागांत धोक्याची पातळी पार केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अप्पर सचिव रामचंद्र डू यांनी याबाबत माहिती दिली आहे. 19 आश्रय कार्यशाळा निर्माण करण्यात आल्या असून त्यात जवळपास 25 हजार लोकांना आश्रय देण्यात आला असून पूरग्रस्त भागांत अडकून पडलेल्या जवळपास पाच लाख लोकांना जेवण देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र तरीही महापुरामुळे लोकांच्या समस्या वाढतच आहेत. लोक आपली घरे सोडून पक्क्या घरांवरील छतांवर किंवा उंच ठिकाणी आश्रय घेत आहेत. सीतामढी, मुझफ्फरपूर, दरभंगा, गोपालगंज, आणि पूर्व चंपारण्य याठिकाणी महापुराची स्थिती भयावह आहे.