भक्तांविना मांढरगडावर काळूबाईची महापूजा

मंदिर परिसरात शुकशुकाट; कडक पोलीस बंदोबस्त
वाई – महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा सोमवारपासून (शाकंभरी पौर्णिमा) सुरू झाली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने यात्रेवर बंदी घातल्याने काळूबाई मंदिर परिसरात शुकशुकाट होता. मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद होती.
मांढरदेवीच्या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात; परंतु मांढरदेव परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याने आणि यात्रा रद्द झाल्याने प्रशासनाने भाविकांना 31 जानेवारीपर्यंत मांढरदेव येथे येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आज मंदिर परिसरात भाविकविना यात्रा झाली. दरम्यान, काल (दि. 16) रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली.
निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीचा जागर झाला. देवीचा गोंधळ सोमवारी सकाळी घालण्यात आला. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मुख्य प्रशासक मंगला धोटे यांच्या हस्ते 6 वाजता देवीची विधिवत पूजा करण्यात आली. ट्रस्टचे चेअरमन एस. जी. नंदीमठ, पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त ऍड. पद्माकर पवार, सीए. अतुल दोशी, चंद्रकांत मांढरे, विजय मांढरे, सुनील मांढरे, सुधाकर क्षीरसागर, ओंकार क्षीरसागर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराला फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे काळूबाईदेवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे.
मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य खबरदारी घेतली आहे. मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात पोलीस उपअधीक्षक व वाईच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक साहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, 87 पुरुष कर्मचारी, 20 महिला वाहतूक कर्मचारी, 24 होमगार्ड, दंगा काबू पथक, जलद कृतिदलाची तुकडी असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मांढरदेवीला येणाऱ्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौकात, वाई एमआयडीसी व कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.





