संशयास्पद मृत्यू झालेल्या महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत सापडली 3 कोटींची कॅश

प्रयागराज – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय त्या प्रकरणात चौकशी करत असून वाघम्बरी मठातील महंतांच्या खोलीची आज तपासणी केली असता त्यात 3 कोटी रूपये रोकड आढळून आली आहे.
सीबीआयची टीम, पोलीस आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्यात आली होती. काही दागिने आणि जमिनींची कागदपत्रेही यावेळी सापडली आहेत.
20 सप्टेंबर 2020 रोजी नरेंद्र गिरी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. मठाच्या गेटजवळ असलेल्या इमारतीतील दोन खोल्या महंत वापरत होते. या दोन्ही खोल्या सील करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या खोल्या उघडल्या जाव्यात अशी विनंती त्यांच्या उत्तराधिकाऱ्याने न्यायालयात केली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोल्या उघडण्यात आल्या. ज्या खोलीत नरेंद्र गिरी झोपायचे त्या पलंगखाली दोन बॅगांमध्ये ही रोकड, दागिने आणि जमिनीची कागदपत्रे सापडली आहेत.


