पुणे – देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या बांधकाम मजुरांनी घरचा रस्ता धरला आहे. मात्र, त्याचवेळी महामेट्रोच्या कामासाठी असलेल्या सुमारे 2 हजार मजुरांना महामेट्रोकडून या लॉकडाऊनच्या काळातही वैयक्तिक सुरक्षा साधनांसह लेबर कॅम्पमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा योग्य पद्धतीने पुरविल्या आहेत. त्यामुळे या मजुरांनी लेबर कॅम्पमध्ये रहाणे पसंत केले आहे.
त्यासाठी मेट्रोकडून सर्व लेबर कॅम्पमध्ये शौचालये, स्नानगृह, स्वयंपाकघर, विश्रांती क्षेत्र व इतर आवश्यक सुविधा आहेत. पुणे मेट्रोने 2 हजार मेट्रोच्या कामगारांसाठी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण विभाग (एसएचई) स्थापन केला आहे. हा विभाग नियमितपणे मजुरांना पुरविल्या जाणाऱ्या वैयक्तिक संरक्षक उपकरणाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचेही महामेट्रोकडून कळविण्यात आले.