Prashant Wavge : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी ओबीसी महासंघाने केली आहे. वावगे यांच्याकडे सध्या ‘महाज्योती’सह ‘वनार्टी’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचाही अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. या तक्रारीनूसार वावगे यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाचा प्रभार असताना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या कंत्राटांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या प्रशिक्षणामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, संस्थेच्या योजनांना उतरती कळा लागली आहे, असे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबरोबरीने वावगे हे संबंधित मंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने, अनेक तक्रारी असूनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उलट दुसऱ्या संस्थेची जबाबदारी देण्यात आली, असा दावा राजूरकर यांनी केला आहे. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना वावगे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात नवीन योजना राबवून ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ देण्याचाच प्रयत्न झाला आहे. ‘वनार्टी’ची जबाबदारी केवळ तात्पुरती असून, तेथे नियमित अधिकारी आल्यावर मी कार्यभार सोपवणार आहे. बदलीचे अधिकार सरकारचे असल्याचे वावगे म्हणाले. एकाच अधिकाऱ्याकडे दोन महत्त्वाच्या संस्थांचा कारभार असल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.